आदिम काळापासून मानव या पृथ्वीवर स्थिरावत असताना त्यांच्या जीवन संघर्षात स्वतःला आनंदित ठेवण्यासाठी बदलत्या काळानुसार मानवाने लोककलांचे विविध प्रयोग केल्याचे दिसून येते. जंगल, दरी, डोंगराळ प्रदेशात वास्तव्याने असलेल्या मानव समूह स्वतःच्या मनोरंजनासाठी किंवा दिवसभर केलेल्या परिश्रमाचा थकवा काढण्यासाठी विविध प्रकारची नृत्ये, वाद्य, संगीत, वेदवेशभूषांचा उपयोग करायला लागला. काळ पुढे पुढे जात असताना या लोकसमूहामध्ये विविध कलावंत निर्माण व्हायला लागले आणि त्यातूनच या भागात अनेक कला स्थिरावल्या. त्यापैकी महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या झाडीपट्टीमध्ये ग्रामीण भागातील लोकांचे मनोरंजन करण्यासाठी लोककला दंडार म्हणून अजूनही स्थिरावलेली आहे.
दंडार ही लोककला या भागात कशी विकसित झाली यामागे काही संदर्भ शोधले असता आपणास अनेक संदर्भ दिसून येतात. झाडीपट्टीमध्ये कवी दंडी नावाचे संस्कृत पंडित होऊन गेलेत. त्यांच्या नावावरून कदाचित दंडार ही लोककला विकसित झाली असावी असा तर्क अनेक इतिहासकारांनी काढलेला आहे. दंडार या लोककलेला हिंदीमध्ये नौटंकी असा पर्याय दिसून येतो.नौटंकी ह्या शब्दाला आपल्यापैकी जवळजवळ सगळेच जण हस्यास्पद दृष्टीने पाहतात आणि त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु नौटंकी हा शब्द बरचं काही दर्शवितो.नौटंकी हे एक नाटकाचा, अभिनयाचा प्रकार आहे.
झाडीपट्टीमध्ये बोलली जाणारी जी बोलीभाषा आहे तिला झाडी बोली असे संबोधले जाते. ही या भागातली बोलीभाषा आहे. झाडीबोलीमध्ये दंड या शब्दाचा अर्थ शेत असा होतो म्हणजेच दंडार या लोकनाट्याचा शेताशी संबंध असावा असे म्हणता येईल. जास्तीचे उत्पन्न झाले की शेतकरी हातात डहाळी घेऊन शेतातच आनंद उत्सव साजरा करायचा आणि सर्व आनंदाने नाचायचे कदाचित दंडारीची जन्मघटिका हीच असावी असाही तर्क काढल्या जातो.
कर्नाटकातील यक्षगान कोकणातील दशावतारी आणि गुजरात मधील गरबा या सभोवतालच्या लोककलांशी जवळचे नाते असल्याचे दिसून येते. दंडारीच्या आकृतीबंध यक्षगणाची आठवण करून देतो. दंडारीमध्ये पौराणिक कथा, येथील संस्कृती दर्शवणारे प्रसंग, कल्पनिक कथांचे अवतार दर्शन, असे विविध प्रसंग दंडारी मधून प्रेक्षकांना दाखवले जाते.
झाडीमपट्टीमधील बहुतांश गावामध्ये दिवाळीच्या वेळेस म्हणजेच कार्तिकीपासून प्रत्येक गावात दंडारीचे प्रयोग केले जातात. पूर्वापार चालत आलेल्या लोककलेला आधुनिकतेची झालर लागलेली आहे. त्यामुळे आता दंडारीचे प्रयोग हे नाट्यसृष्टी आणि सिनेसृष्टीशी जुळणारे दिसून येतात. दंडारीचे प्रयोग करणारे कलावंत हातात दोन दंड घेऊन नाचतात. दंडारीत प्रत्येक व्यक्तीने दोन दंड धरायचे आणि स्वतःच ते एकमेकांवर आपटून वाजवायचे हे अभिप्रेत आहे. दिवाळीमध्ये आताही अनेक गावांमध्ये असे दंडारीचे प्रयोग केले जातात. झाडीपट्टीमध्ये दंडारीत नर्तकांच्या हातात केवळ एकच टायरा दंड असतो. पायात घांगऱ्या आणि हातात टायरा घेऊन केलेले हे नृत्य असते. तमाशाचा जसा फड तशी दंडारीत मंडळी असते परंतु दंडारीला तमाशा सारखे व्यावसायिक स्वरूप आलेले नाहीत तसेच दंडारीत केवळ पुरुषांची मक्तेदारी दिसून येते. आधुनिक तमाशा प्रमाणे दंडारीत मात्र अजून स्त्रियांच्या शिरकाव झालेला नाही.
दंडारीमध्ये तुनतुनेवाला, ढोलकीवाला, झांजवला आणि गायक असलेला शाहीर असतो. ढोलकीच्या तालावर आणि तुनतुने आणि टाळच्या संगीतात नाद माधुर्य निर्माण होऊन क्षणभर प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका थांबावा असा हा वाद्यबंध निर्माण होतो. दंडारीत वाद्यवृंद वाजत असताना पायात घुंगरू बांधलेली आणि हातात टहारा हलविणारी राजस वेशातील नर्तक मुले एक एक करून प्रवेश करतात. रात्री नऊ दहा वाजता सुरू झालेली दंडार दिवस उजाडेपर्यंत चालू असते.
दंडारीचे सर्वसाधारणपणे तीन प्रकार पाहायला मिळतात. खडीगंमत, प्रसंगी आणि बैठक यापैकी खडीगंमत हा पहिला प्रकार अतिशय लोकप्रिय आहे. रात्रीच्या कार्यक्रमात देखील याच प्रकारात दंडारीचा कार्यक्रम केला जातो. कवी कालिदास, भगवती इत्यादी प्राचीन संस्कृत पंडितानी लिहिलेल्या नाटकांच्या नाटकातील पात्रांची आठवण व्हावी अशी ही दंडारीची आखणी आणि सादरीकरण पाहायला मिळते.
दंडारीमध्ये गद्याबरोबर पद्यांचा सुद्धा वापर केला जातो.येथील लावण्याचे लावण्य मनाला मोहित करणारे असते. मन मोहून टाकणारा शृंगार तर तिथे असतो त्याशिवाय प्रेम, करूणा, वीरता या रसांचा देखील समावेश असतो. दंडरीमध्ये संवाद आणि पद हे जवळपास सारख्याच प्रमाणात असतात. भिन्न चाली व भिन्न ताल यांच्यामुळे या लावण्या कानाला गोड वाटतात. मनाला चिंब भिजवून टाकतात. लावणीचे विविध प्रकार आहेत.लावणीच्या स्वरूपात मराठीला नवीन छंद रचना बाहाल केली आहे. दंडार या लोककलेतील लावणी आपल्या प्रेक्षकांना खिळवून ठेवते तसेच विविध पडद्याने नटलेले तिचे नेपथ्य देखील आपल्या डोळ्यांचे पारडे फरते.
आजच्या अध्यायवत नाटकालाही लाजवेल असे हे नेत्रवेदक नेपथ्य, प्रकाशयोजना झाडीपट्टीच्या रंगभूमीला या परंपरागत दंडारी कडून प्राप्त झालेले आहे.दंडारीला मराठी नाटकाचा उषाकाल असेही म्हटले जाते.
------------------------------
अरूण झगडकर
(इतिहास अभ्यासक)
अध्यक्ष झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर
९४०५२६६९१५
No comments:
Post a Comment