Thursday, 25 July 2024

पिंपळ वृक्ष

 वड, पिंपळ आणि कडुलिंब ही झाडे भारतीय प्रजातीची आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून सरकार तर्फे स्थानिक प्रजाती लावणे बंद केलेले आहे. या प्रजाती 100% कार्बन डायऑक्साइड शोषक आहेत. परंतू लोकांनी परदेशी झाडाची लागवड करण्यास सुरुवात केलेली आहे, ज्यामुळे जमीन निर्जल होत आहे.आता वातावरण बिघडलेले आहे, सतत उष्णता वाढत आहे आणि उष्णता वाढली की  पाणी जलपातळी वाफेसारखी उडत चालली आहे. दर 500 मीटर अंतरावर एक पिंपळाचे झाड लावा,त्यामुळे येत्या काही वर्षांत भारत नक्कीच प्रदूषणमुक्त होईल.


Saturday, 22 October 2022

वृकोदर वादळ....

वृकोदर वादळ....

अचानकच घोंगावणारे वादळ आले  
दणकण आदळले 
अन् निघून गेले
चक्रीवादळासारखे.....
मी मात्र पाहतच राहिलो.... एकटक 
परिणामांची मीमांसा करावी म्हणून 
वादळ भयानक होते
न पांगवणारे
हलवून सोडणारे
तोडफोड करणारे....
वादळाने ....काही डगमगले 
काही गुदमरले 
तर काही कोलमडून पडले 
शरणागत स्थितीत.... 
काही व्रतस्थ झाले
काही प्रशस्त झाले
तर काही सशक्त झाले
पण मी तटस्थच राहिलो 
स्तंभा सारखा.... 
काहींचे रंग बदलले
काहींचे ढंग बदलले
तर काहींचे संघ बदलले 
तरीही मी संथ
डोहातील पाण्यासारखा....
काही भोवऱ्यात सापडले
काही दगडावर आपटले
काही गरगर फिरले
काही कोलमडून पडले 
जीर्ण झालेल्या वृक्षागत..
काही पाहून गेले
काही वाहून गेले
तर काही गोडवे गाऊन गेले
वेताळ बंदीजनासम..
काही धडपडले
काही फडफडले
पुन्हा उभे होण्यासाठी...
कुबड्यांचा आधार शोधत 
मी मात्र निर्मोही 
फायकस वृक्षाच्या स्थितीत 
साक्षीदार म्हणून...

🖋️अरूण झगडकर,गोंडपिपरी
9405266915

Thursday, 6 October 2022

देहांतरण....

देहांतरण 

गर्भास्थान सुटले 
अंकुर फुटले 
वंशवृक्षाच्या अविर्भावात 
वाढत गेले , बहरत गेले
निसर्ग कोप सांभाळीत
मातृत्व अन् दातृत्वाच्या परीसिमेकडे 
औदार्यता सिद्ध व्हावी हा आशावाद बाळगून

जोडत गेले ,मोडत गेले
देह अहंकार सोडत गेले 
सृष्टीचे सचेतन बीज स्त्रोत 
नवनिर्मितीच्या आशेने

कित्येक आली संकटे 
चक्रीवादळे, मानवी हस्तक्षेपही
उन्मळून पाडण्यासाठी
सोडला नाही धीर देहाने
भार सोसला,मार सोसला
संकटातील वार सोसला
निराश्रितांना आधार दिला
झाला आश्रयदाता पांथस्थांचा याच जन्माने

अन्न दिले, पाणी दिले
छाया दिली, माया दिली
आसराही दिला शत्रू मित्र न जाणवता
झिजत गेले, भिजत गेले 
अल्प सुखाने विझत गेले
देह चरितार्थ सांभाळीत उभयतृप्तीच्या आस्वादाने

आता 
स्थूलदेहाच्या रूक्ष फांद्या  प्रतिक्षीत 
आपल्याच जीवन्मुक्तीसाठी
नाती तुटली, आशा मिटली
देहावरची कातडी सुटली 
खोलवर पसरलेली जाळे सैल झाली 
विदेहमुक्तीच्या वाटेने

चैतन्य संपले, अस्तित्व भंगले
आपले होते दूर झाले, 
अश्रूंचेही पूर आले,देहाचेही धूर झाले
अंतेष्टीच्या भडाग्नीने 
देहाने मृत्तिकेशी उत्परिवर्तन केले
पुन्हा देहांतरण होणारच
जनुकीय वैविधता जपायची आहे म्हणून...

कवी :- अरूण झगडकर
मु.पो.ता :- गोंडपिपरी जिल्हा चंद्रपूर
9405266915


Monday, 3 October 2022

झाडीपट्टीतील लोककला :- दंडार



आदिम काळापासून मानव या पृथ्वीवर स्थिरावत असताना त्यांच्या जीवन संघर्षात स्वतःला आनंदित ठेवण्यासाठी बदलत्या काळानुसार मानवाने लोककलांचे विविध प्रयोग केल्याचे दिसून येते. जंगल, दरी, डोंगराळ प्रदेशात वास्तव्याने असलेल्या मानव समूह स्वतःच्या मनोरंजनासाठी किंवा दिवसभर केलेल्या परिश्रमाचा थकवा काढण्यासाठी विविध प्रकारची नृत्ये, वाद्य, संगीत, वेदवेशभूषांचा उपयोग करायला लागला. काळ पुढे पुढे जात असताना या लोकसमूहामध्ये विविध कलावंत निर्माण व्हायला लागले आणि त्यातूनच या भागात अनेक कला स्थिरावल्या. त्यापैकी महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या झाडीपट्टीमध्ये ग्रामीण भागातील लोकांचे मनोरंजन करण्यासाठी लोककला  दंडार म्हणून अजूनही स्थिरावलेली आहे.
    दंडार ही लोककला या भागात कशी विकसित झाली यामागे काही संदर्भ शोधले असता आपणास अनेक संदर्भ दिसून येतात. झाडीपट्टीमध्ये कवी दंडी नावाचे संस्कृत पंडित होऊन गेलेत. त्यांच्या नावावरून कदाचित दंडार ही लोककला विकसित झाली असावी असा तर्क अनेक इतिहासकारांनी काढलेला आहे. दंडार या लोककलेला हिंदीमध्ये नौटंकी असा पर्याय दिसून येतो.नौटंकी ह्या शब्दाला आपल्यापैकी जवळजवळ सगळेच जण हस्यास्पद दृष्टीने पाहतात आणि त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु नौटंकी हा शब्द बरचं काही दर्शवितो.नौटंकी हे एक नाटकाचा, अभिनयाचा प्रकार आहे.
    झाडीपट्टीमध्ये बोलली जाणारी जी बोलीभाषा आहे तिला झाडी बोली असे संबोधले जाते. ही या भागातली बोलीभाषा आहे. झाडीबोलीमध्ये दंड या शब्दाचा अर्थ शेत असा होतो म्हणजेच दंडार या लोकनाट्याचा शेताशी संबंध असावा असे म्हणता येईल. जास्तीचे उत्पन्न झाले की शेतकरी हातात डहाळी घेऊन शेतातच आनंद उत्सव साजरा करायचा आणि सर्व आनंदाने नाचायचे कदाचित दंडारीची जन्मघटिका हीच असावी असाही तर्क काढल्या जातो.
   कर्नाटकातील यक्षगान कोकणातील दशावतारी आणि गुजरात मधील गरबा या सभोवतालच्या लोककलांशी जवळचे नाते असल्याचे दिसून येते. दंडारीच्या आकृतीबंध यक्षगणाची आठवण करून देतो. दंडारीमध्ये पौराणिक कथा, येथील संस्कृती दर्शवणारे प्रसंग, कल्पनिक कथांचे अवतार दर्शन, असे विविध प्रसंग दंडारी मधून प्रेक्षकांना दाखवले जाते. 
       झाडीमपट्टीमधील बहुतांश गावामध्ये दिवाळीच्या वेळेस म्हणजेच कार्तिकीपासून प्रत्येक गावात दंडारीचे प्रयोग केले जातात. पूर्वापार चालत आलेल्या लोककलेला आधुनिकतेची झालर लागलेली आहे. त्यामुळे आता दंडारीचे प्रयोग हे नाट्यसृष्टी आणि सिनेसृष्टीशी जुळणारे दिसून येतात. दंडारीचे प्रयोग करणारे कलावंत हातात दोन दंड घेऊन नाचतात. दंडारीत प्रत्येक व्यक्तीने दोन दंड धरायचे आणि स्वतःच ते एकमेकांवर आपटून वाजवायचे हे अभिप्रेत आहे. दिवाळीमध्ये आताही अनेक गावांमध्ये असे दंडारीचे प्रयोग केले जातात. झाडीपट्टीमध्ये दंडारीत नर्तकांच्या हातात केवळ एकच टायरा दंड असतो. पायात घांगऱ्या आणि हातात टायरा घेऊन केलेले हे नृत्य असते. तमाशाचा जसा फड तशी दंडारीत मंडळी असते परंतु दंडारीला तमाशा सारखे व्यावसायिक स्वरूप आलेले नाहीत तसेच दंडारीत केवळ पुरुषांची मक्तेदारी दिसून येते. आधुनिक तमाशा प्रमाणे दंडारीत मात्र अजून स्त्रियांच्या शिरकाव झालेला नाही.
    दंडारीमध्ये तुनतुनेवाला, ढोलकीवाला, झांजवला आणि गायक असलेला शाहीर असतो. ढोलकीच्या तालावर आणि तुनतुने आणि टाळच्या संगीतात नाद माधुर्य निर्माण होऊन क्षणभर प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका थांबावा असा हा वाद्यबंध निर्माण होतो. दंडारीत वाद्यवृंद वाजत असताना पायात घुंगरू बांधलेली आणि हातात टहारा हलविणारी राजस वेशातील नर्तक मुले एक एक करून प्रवेश करतात. रात्री नऊ दहा वाजता सुरू झालेली दंडार दिवस उजाडेपर्यंत चालू असते.
    दंडारीचे सर्वसाधारणपणे तीन प्रकार पाहायला मिळतात. खडीगंमत, प्रसंगी आणि बैठक यापैकी खडीगंमत हा पहिला प्रकार अतिशय लोकप्रिय आहे. रात्रीच्या कार्यक्रमात देखील याच प्रकारात दंडारीचा कार्यक्रम केला जातो. कवी कालिदास, भगवती इत्यादी प्राचीन संस्कृत पंडितानी लिहिलेल्या नाटकांच्या नाटकातील पात्रांची आठवण व्हावी अशी ही दंडारीची आखणी आणि सादरीकरण पाहायला मिळते.
   दंडारीमध्ये गद्याबरोबर पद्यांचा सुद्धा वापर केला जातो.येथील लावण्याचे लावण्य मनाला मोहित करणारे असते. मन मोहून टाकणारा शृंगार तर तिथे असतो त्याशिवाय प्रेम, करूणा, वीरता या रसांचा देखील समावेश असतो. दंडरीमध्ये संवाद आणि पद हे जवळपास सारख्याच प्रमाणात असतात. भिन्न चाली व भिन्न ताल यांच्यामुळे या लावण्या कानाला गोड वाटतात. मनाला चिंब भिजवून टाकतात. लावणीचे विविध प्रकार आहेत.लावणीच्या स्वरूपात मराठीला नवीन छंद रचना बाहाल केली आहे. दंडार या लोककलेतील लावणी आपल्या प्रेक्षकांना खिळवून ठेवते तसेच विविध पडद्याने नटलेले तिचे नेपथ्य देखील आपल्या डोळ्यांचे पारडे फरते. 
      आजच्या अध्यायवत नाटकालाही लाजवेल असे हे नेत्रवेदक नेपथ्य, प्रकाशयोजना झाडीपट्टीच्या रंगभूमीला या परंपरागत दंडारी कडून प्राप्त झालेले आहे.दंडारीला मराठी नाटकाचा उषाकाल असेही म्हटले जाते.
------------------------------

अरूण झगडकर 
(इतिहास अभ्यासक) 
अध्यक्ष झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर
९४०५२६६९१५

Wednesday, 10 August 2022

घाटकुळ:- एक प्राचीन काळातील वैभव


चंद्रपुर जिल्हयातील पोंभूर्णा तालुक्यातील वैनगंगा नदीकाठी वसलेले "घाटकुळ "हे गाव आणि तेथील दगडी अवशेषांच्या खुणा अजूनही प्राचीन वैभव्याची साक्ष देताना दिसून येते. वैनगंगा नदीच्या अगदी काठावर असलेल्या घाटकूळच्या जुन्या ठिकाणाचे,ओसाड पडलेल्या जुन्या वस्तीचे, रिठाचे, रानांचे,मातीचे निरीक्षण केले असता हे ठिकाणी विविध राज्यांच्या राजवटीत गजबजलेले गाव असावेता या अर्थाचे पुरावे अजूनही दिसून येतात.
    एकेकाळी घाटकूळ हे गावा परगण्याचे मोठे शहर असल्याचा उल्लेख अ.ज.राजुरकर या इतिहास अभ्यासकांनी चंद्रपूर जिल्ह्याचा प्राचीन इतिहास या पुस्तकात केलेला आहे. वैनगंगेच्या काठावरील परगण्याचे ठिकाण असलेल्या या स्थळांकडे इतिहासकारांचे लक्ष कदाचित गेले नसणार त्यामुळे घाटकुळ हे गाव आणि तेथील वैभव्य ऐतिहासिक स्थळांच्या यादीत आलेले नाहीत. 
     या स्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन निरीक्षण केले असता अजूनही सातवाहन,वाकाटकद काळातील बांधकामात वापरलेल्या पक्या मातीच्या विटा दिसून येतात.विविध कलाकुसरीच्या दगडी मुर्त्या,शिवलिंग,गणेश,नागशिल्प इतरत्र पडलेले दिसून येते.पुर्वी नदीला लागून एक बाल्लेकिल्ला असल्याचे येथील वयोवृध्द मंडळी सांगतात. पण आता त्याची अवशेष सुद्धा शिल्लक नाहीत. कारण नदिकाठावरून गाव उंचभागावर स्थलांतरीत झाला तेव्हा त्या बाल्लेकिल्याचे दगड घरकामात वापरल्याचे बोलले जाते. बाल्लेकिल्लाच्या परीसरांचे निरीक्षण करीत असतांना एका उंच ठिकाणी काही शिल्पे आढळून आलीत .या शिल्पाचे निरीक्षण केले असता ही सर्व स्री शिल्प होती. ही शिल्पे उभी असून अत्यंत सुंदर कलात्मक पध्दतीने शिल्प कलावंतांनी कोरलेली आहेत. स्री शिल्पाच्या कानात मोठी कर्णकुंडले आहेत .कर्णकुंडले आज स्रीया जशी सुवर्णाची कर्णकुंडले घालतात त्या डिझाईनची म्हणजे कानांच्या खालील पाळीतून कानाच्या वरच्या भागात सुवर्णाचे डिझाईन परीधान केलेले दिसून येते. दोन्ही हातात मोठमोठी बाजुबंध परीधान केलेली आहेत .
या शिल्पातील स्रीने आजच्या स्रियां जसा टाॅप परीधान करतात त्याप्रमाणे शरीरावर टाॅप परीधान केलेला आहे. टाॅपवरील पायांच्या वरील त्रिकोणी डिझाईन शिल्पात स्पष्ट दिसून येते. शिल्पाच्या डाव्या हाताच्या मनगटांवर एक लहान मुलगा उभा आहे. स्त्रीने दोन्ही हातांनी दीप धरलेला असून उजव्या हातांनी तो दीप विझू नये म्हणून दीपावर आडवा धरलेला आहे. स्री शिल्पाच्या डोक्यावर एका नागाचे छत्र धारण केलेले असून. नागाच्या शरीराचा भाग हा स्रिच्या पाठीवर आलेला आहे. हे स्री शिल्प हातात दीप घेऊन द्वीपपुजन करण्याकरीता जात आहे असे हया शिल्पावरुन दिसून येते.शिल्पाच्या नाग छत्रावरुन ह्या स्रियां नागवंशीय राजघराण्यातील होत्या हे सिध्द होते. कदाचित हे स्री शिल्प नागवंशीय नागराणीचे असावेत असा तर्क प्रत्यक्षदर्शी बघितलेल्या अभ्यासकांनी लावलेला आहे.
   या प्राचीन किल्ल्याच्या टेकडीत किती प्राचीन इतिहासाचा खजिना दडलेला आहे हे एक महाकोडे आहे.
    पुरातत्व विभागाला नम्र विनंती आहे की, त्यांनी दखल घेऊन या बाल्लेकिल्ला टेकडीचे उत्खनन करावे जेणेकरून या भागातील प्राचीन संस्कृतीची ओळख अभ्यासकांना होईल आणि भूगर्भात लपलेला इतिहास जगासमोर येईल.

अरूण झगडकर
( इतिहास अभ्यासक)
गोंडपिपरी जि.चंद्रपूर
9405266915

वैनगंगेच्या काठावरील.... झगडकर रीठ



वैनगंगा नदीच्या तीरावर डोंगराच्या पायथ्याशी अगदी झाडाझुडपामध्ये लपलेली लहान मोठी दहा-पंधरा घरांची वस्ती असलेले माझे गाव. निसर्गाचा मनमुराद आनंद घ्यावा असे प्रसन्न वातावरण, शुद्ध हवा , चोहीकडे हिरवेगार शेते, पक्षांचा आणि जंगली प्राण्यांचा मुक्त वावर असलेले प्रसन्न वातावरण माझ्या गावात अजूनही अनुभवायला मिळते.
         इंग्रज कालीन दस्तऐवजमध्ये माझ्या गावाचे नाव चकठाना जरी असले तरी परंतु आजच्या घडीला माझ्या गावाला झगडकर रिठ याच नावाने ओळखले जाते. कित्येक वर्ष आम्ही या गावात चिखल मातीतून पायदल चालून शाळा शिकलो. गावाला जोडणारा एकही मुख्य रस्ता नाही त्यामुळे शेतातून सतत चालू चालून पायवाट तयार व्हायची. मला अजूनही त्या पायवाटा कायमचा स्मरणात आहेत. तेव्हा गावात वीज नव्हती. शाळा तर खूप दूरची गोष्ट आहे. कित्येक वर्षे विकासापासून कोसो दूर असलेल्या माझ्या गावात आता मागील दोन-चार वर्षापासून विज पुरवठा केला आहे. गावातील रस्ता मुख्य मार्गाला जोडला जात आहे.
       तसे बघितले तर माझे गाव खूप प्राचीन असल्याचे जाणवते. कारण गावांच्या आजूबाजूला असलेल्या भग्न मुर्त्या, जुनी काही अवशेष आजही आपल्याला प्राचीन कालखंडाची साक्ष देतात. गावालाच लागून असलेले मारीतीचे मंदीर परिसर पाहून ते खूपच जुने आहेत असे आमचे आजोबा सांगत होते.मंदिराच्या आजूबाजूला पडलेले प्राचीन शिल्प, विटा, दगड अजूनही प्राचीन काळातील अस्तित्वाचे पुरावे दाखवतात. नदी काठावर गाव असल्यामुळे यदाकदाचीत पूर्वीच्या काळात येणारे महापुरे, महामाऱ्या यामध्ये पूर्वीचे गाव नष्ट झाले असावे आणि नव्याने लोक वस्ती तयार होऊन नवीन वहिवाट सुरू झाली असावी असा जुन्या जाणकार लोकांचा अंदाज आहे.
      पूर्वीच्या काळातील शेती ही परंपरागत पद्धतीची शेती होती त्यामुळे उत्पादन क्षमता खूप कमी होती.परंतु बदलत्या काळानुसार आता या गावातील शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करायला लागला आहे. नवीन नवीन कृषी अवजारांचा वापर करून उत्पादन क्षमता वाढवित आहे. जरी शहराच्या झगमगटापासून कोसो दूर असले तरी निसर्ग सौंदर्याच्या मुक्त उधळणीत गावातील शेतकरी बांधव मोठ्या अभिमानाने "गड्या आपला गाव बरा" या अविर्भावात जीवन जगत आहेत. गाव जरी लहान असेल तरी त्याच गावाला तीर्थ समजून येतील गावकरी गुण्यागोविंदाने नांदत आहेत.

🖋️अरूण झगडकर
९४०५२६६९१५

Friday, 15 July 2022

कमलापुर :- चमत्काराचा नैसर्गिक वारसा



स्वर्गाची कल्पना केली तरी आपले मन अवकाशात जाऊन स्थिरावते. मेघविरहित स्वच्छ सुंदर निरभ्र आकाश नजरेसमोर येतो आणि कपोलकल्पित विश्वात आपले मन रममान होते.परंतु आपणास प्रत्यक्ष पृथ्वीवरच्या स्वर्ग बघायचा असेल तर ते गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूरच्या जंगलात प्रत्यक्ष अनुभवायला मिळतो. निसर्गाच्या रंगछटांची उधळण केलेले हे स्थळ प्राचीन काळापासूनच सृष्टीचे वरदान ठरलेले आहे. प्राचीन काळापासून या भागावर राष्ट्रकुट, चालुक्य, देवगिरीचे यादव आणि त्यानंतर अहेरी येथील गोंड राजघराण्यानी राज्य केलेले आहेत. कमलापूर हे गाव सिरोंच्या वनक्षेत्रात येत असून ते अहेरी तालुक्यात आहेत. निसर्गरम्य सौंदर्याने नटलेल्या परिसरात हे गाव वसलेले आहे.वैभव संपन्न जंगल परिसर, पर्यटकांना मोहीत करणारे निसर्गरम्य स्थळे ,प्रसन्न वातावरण , शासकीय हत्ती कॅम्प, उंच डोंगरावर असलेल्या तलाव, त्या परिसरातील धबधबे, मुबलक पाणी आणि खाद्यसामग्रीचा ठेवा, महाराष्ट्रातील एकमेव जंगली म्हशीसाठी राखीव असलेले प्रसिद्ध कोलामार्का अभयारण्य, गिधाड संरक्षण केंद्रे, वडधम जीवाश्म पार्क,लक्का मेट्टा हे नैसर्गीक लक्षागृह,राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी श्रमदानातून आदिवासी मुलांसाठी बांधलेली महाराष्ट्रातील पहिले आश्रम शाळा, व इतर स्थळे पर्यटकांसाठी विशेष आकर्षित केंद्र आहेत. 
   कमलापूर हे महाराष्ट्रातील एकमेव राखीव हत्ती संवर्धन क्षेत्र आहे.वनविभागाच्या हत्ती कॅम्प परिसरात तीन डोंगर होते. या डोंगराच्या पायथ्याशी मोठा तलाव आहे. रखरखत्या उन्हात हिरवेगार निसर्गसौंदर्य केवळ नजरेलाच नव्हे तर मनालाही गारवा देऊन जाते. हिवाळ्याच्या दिवसात तर येथील सौंदर्य अधिक खुलते धुक्यात हरविलेले डोंगरमाथे जणू तलावाच्या पाण्यावर जमलेली धुक्याची चादर काश्मीरची आठवण करून देते. हे स्थळ राज्याच्या नकाशावर वनवैभव्याची भर टाकणारी आहेत. राज्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या आदिवासीबहुल जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील कोलामार्का संकुलात रानटी म्हशींचे अस्तित्व आहे. सिरोंचा वनविभागाकडून या म्हशींच्या संवर्धनाचे काम अविरतपणे सुरू आहे. त्याचप्रमाणे  तालुक्यातील घनदाट जंगलात वडधम येथे डायनोसोरचे जीवाश्म आढळून आले आहे.आता त्याठिकाणी वडधम जीवाश्म पार्क म्हणून संरक्षित करण्यात आलेले आहे.
प्राणहिता नदीच्या काठावरील घनदाट जंगलात प्राचीन काळापासून लक्का मेट्टा हे नैसर्गीक लक्षागृह प्रसिद्ध आहे. प्राचीन कथांनुसार महाभारत काळात जेव्हा कौरवांनी पांडवांना मारण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा पांडवांनी लक्षागृहात आश्रय घेतला होता. हे लक्षागृह बराच काळ जळत राहिले आणि पांडवांची त्यातून आपली सुटका करून घेतली होती. त्यासाठी पांडवांनी एक छुपा मार्ग वापरला, जो तलावात उघडत होता. लक्षागृहाच्या विटा, छुपा मार्ग, तलाव या सर्व सत्याची साक्ष हे स्थळ अजुनही देत आहे. लक्षागृह हे नैसर्गिक घटकांचे बनलेले आहे. चमत्काराचा नैसर्गिक वारसा लाभलेल्या या प्रदेशाला अभ्यासकांनी अवश्य भेट द्यावी.प्रत्यक्ष या भागाचे अवलोकन केल्यानंतर येथे जणू स्वर्गच उतरल्याचा भास होतो.

अरूण झगडकर,गोंडपिपरी
९४०५२६६९१५